संग्रामपूर येथील एसबीआय एटीएमवर २० लाखाचा चोरट्यांनी मारला डल्ला
दोन आरोपी 'तिजोरी' सह पकडले; जालना येथे केले जेरबंद; विशेष पथक रवाना
संग्रामपूर
संग्रामपूर येथे बँक ऑफ महाराष्ट्र, एच .डी.एफ.सी, नांदुरा अर्बन व एस.बी.आय अशा चार अधिकृत बँका असून चारही बँकांना एटीएम सुविधा उपलब्ध आहे. परंतु फक्त एचडीएफसी एटीएमवरच सिक्युरिटी गार्ड आहे. बाकी तीनही बँकेच्या एटीएमवर सिक्युरिटी गार्ड ठेवलेला नसल्यामुळे एस.बी.आय. बैंक शाखा संग्रामपूर येथील एटीएमवर चोरट्यांनी २० लाख रु.चा डल्ला मारला. माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात सुरुवात केली. बैंक एटीएम वरील सीसीटीव्ही फुटेज चेक केली असता त्यात चार ते पाच अज्ञात आरोपी आढळून आले. सदर चोरट्यांनी एटीएमला दोरी बांधून पांढऱ्या रंगाच्या मालवाहक गाडीच्या सहाय्याने ओढून सदर एटीएम मशीन गाडीत टाकून चोरून नेली. त्यामध्ये १७ लाख ७८ हजार रुपये कॅश व हायसन कंपनीची एटीएम मशीन किंमत २ लाख २२ हजार रूपये असा एकूण ३० लाख रुपयांच मुद्देमाल चोरून नेला. तसेच एटीएम रूमची तोडफोड करून नुकसान केले.
सदरची घटना ७ जानेवारी रोजी पहाटे ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली. या घटनेची फिर्याद शेखर सहदेव चौरे (वय ४२) यांनी तामगाव पोलीस स्टेशनला दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी अप क्रमांक ०५/२४ कलम ३८०, ४२७, ३४ भांदवीप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर बुलढाणा डॉगस्कॉड पथक तपासा करत आहेत परंतुसंशयास्पद वस्तू मिळून आल्या नाही. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार उलेमाले करीत आहे.
तर मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे एटीएम मशीन कट करताना चोरटे दिसले तर पोलिसांना पाहून ते तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यापैकी दोन आरोपींना जागेवर पकडले असून त्यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य साधने तसेच एक एसबीआय कंपनीचे एटीएम मशीन व एक विना नंबरची अशोक लेलैंड कंपनीचे पिकअप वाहन असे मिळून आले. सदर आरोपींविरुध्द मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६/२०२४ भादंवि कलम ३९९,४०२ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दयासिंग गुलजारसिंग टाक (वय ४५ वर्षे), नरसिंह अत्तरसिंग बावरी (वय ६० वर्षे) दोघे रा. शिकलाकारी मोहल्ला मंगळ बाजार ता. जि. जालना तर पळून गेलेला आकाशसिंग नरसिंग बावरी व इतर दोन अनोळखी इसम असे आहेत. आपल्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठे एटीएम मशीन फोडून त्यातील एटीएम चोरून घेऊन गेलेले असेल तर मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना येथे संपर्क करावा असे आवाहन मौजपुरी पोलीस स्टेशन जिल्हा जालना यांच्याकडून करण्यात आले असून तामगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळंके तसेच बीट जमदार कुसुंबे यांच्यासह तामगाव पोलीस स्टेशनची बरीच टीम जालना येथे गेली आहे.