दिव्यांग व्यक्तींना कुटुंब उदरनिर्वाह होण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्था कडून मदतीचा हात
श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी)
दत्तनगर :- दिव्यांग व्यक्तींना नोकरी मिळणे आवश्यक असते. परंतु सध्या सर्वसामान्य व्यक्तीलाच नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे.त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना तर नोकरी हे दिवास्वप्न ठरत आहे.त्यावर यशस्वी मात करण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्था दिव्यांगांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे दिव्यांग कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी मदत होत आहे. दत्तनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंध प्रवर्गातील सौ. वंदना उबाळे यांना व्यवसायासाठी पिठाची गिरणी देऊन आर्थिक,कौंटुबिक व सामाजिक पुनर्वसन करण्यात आले आहे.
दत्तनगर येथील आसान दिव्यांग संघटनेच्या सर्व सभासदांकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येईल असे प्रतिपादन दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सारिका कुंकूलोळ यांनी पिठाची गिरणी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे होते.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकलोळ,माजी सरपंच सुनिल शिरसाठ,तंटामुक्ती अभियान समिती अध्यक्ष रविंद्र गायकवाड ग्रामविकास अधिकारी रुबाब पटेल,सुधीर ब्राम्हणे, ग्रामपंचायत सदस्य सागर भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि गायकवाड यांनी केले तर आभार रुबाब पटेल यांनी मानले