Breaking News
recent

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन


                


                        फितूरी हा इथल्या मातीला लागलेला खूप मोठा कलंक आहे.    

खरंतर इतिहासात 'जर' आणि 'तर' या गोष्टींना अजिबात स्थान नसतं. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याचबरोबर आमच्या मातीला लागलेला सर्वात मोठा कलंक म्हणजे 'फितुरी' हे सुध्दा तितकच सत्य आहे. याला इतिहास साक्षी आहे. आणि इतिहासातलं ते वास्तव आम्ही स्विकारले पाहिजे.

१८१८ साली कोरेगाव-भिमा येथे पेशवे विरूध्द इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला आणि पुण्यातल्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला. या देशात ईस्ट इंडिया कंपनीची म्हणजेच ब्रिटीशांची सत्ता प्रस्थापित झाली. देशातली सगळी संस्थाने ब्रिटीशांनी खालसा करण्याचा सपाटा लावला, संस्थानिक, राजे महाराजे यांना आपलं मांडलिक बनवून घेतलं. देशातल्या गोरगरीब जनतेवर ब्रिटीशांचा जोरजबरदस्ती अन्याय अत्याचार चालू झाला. याच काळात सह्याद्रीच्या देऱ्या-खोऱ्यातून, हर हर महादेव! येळकोट येळकोट जय मल्हार..! अशी गर्जना करत उमाजी नाईक नावाचं एक भलं मोठं आव्हान इंग्रजांपुढे उभं राहिलं..

पेशवाईच्या काळात झालेल्या अन्याय अत्याचाराच्या जखमा अजुनही ओल्याच होत्या. तोवर या देशात ब्रिटीशांसारख्या नव्या जुलमी राजवटीची सुरूवात झाली. परंतु ज्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकियांची गुलामगिरी मोडीत काढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उमाजी नाईकांनी ब्रिटीश सत्तेविरोधात एल्गार पुकारला, इंग्रजांच्या विरोधात गनिमी काव्याने उमाजीराजेंच्या कारवाया सुरू झाल्या. संधी पाहून सरकारी खजिन्यावर छापे पडू लागले, गावागावातील कुलकर्णी, पाटील, देशमुख यांच्याकडून खंड वसूल केला जाऊ लागला, छापेमारी, लुट, खंड वसूली यातून मिळणारा पैसा त्यांनी खंडोबााच्या देवस्थानासाठी, गोरगरीब जनतेसाठी, सैन्याच्या पुढील रणनीतीसाठी वापरला, गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. कित्येक लेकीबाळींचे उध्वस्त झालेले संसार उमाजीराजेंनी सुरळीत केले. त्यामुळे उमाजीराजांबद्दलची लोकप्रियता वाढू लारली, अनेक जाती-धर्माची लोकं त्यांच्या सैन्यात सामील होऊ लागली. इंग्रजांविरोधात कारवायांमध्ये अनेकदा इंग्रजांसोबत उमाजी राजेंच्या चकमकी उडाल्या, काही लढायांमध्ये इंग्रज सैनिकांची मस्तकं मारल्याच्या नोंदी इतिहासात आहेत..

१८२८ मध्ये बिकट परिस्थिती लक्षात घेता उमाजीराजेंना नाईलाजाने इंग्रजांसोबत तह करावा लागला व इंग्रजांच्या चाकरीक राहून उमाजीराजे आपले उद्दिष्ट पुर्ण करू लागले. परंतु १८३० मध्ये हा सह्याद्रीचा वाघ इंग्रजांची नोकरी सोडून पुन्हा कुशीत आला. आणि पुन्हा नव्याने इंग्रजांच्या विरोधात बंंड उभं केलं. खरंतर उमाजीराजे इंग्रजांच्या चाकरीत जाण्यापुर्वीचं बंड सह्याद्रीपुरतं मर्यादीत होतं. आणि ते इंग्रजांच्या चाकरीतून बाहेर पडल्यावर केलेलं बंड म्हणजे एक प्रकारे स्वतंत्र राज्याचा, स्वराज्याचा पुकारच होता. हे त्यांनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी काढलेल्या जाहीरनाम्यावरून सिध्द होते. 

त्या जाहीरनाम्यात उमाजीराजे म्हणतात :  कि सरकार च्या आज्ञेने हिंदूस्थानच्या तमाम रहिवाशांना उद्देशून हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. सर्व राजे, सरदार व इतर लोक यांना आदेश देण्यात येत आहे, त्यांनी युरोपिय पुरूष आणि सैनिक जेथे दिसतील तेथे त्यांची मस्तके मारावीत.. या मोहिमेत जे क्रियाशील असतील त्यांना नव्या सरकार कडून इनामे मिळतील, ज्यांची वतने हिरावून घेण्यात आली आहेत त्यांना ती परत मिळावी म्हणून अशा लोकांनी नव्या सरकारला उपयोगी ठरावे, मातीतल्या लोकांनी इंग्रजांच्या चाकऱ्या सोडाव्यात, सर्वांनी एकत्र येऊन एकाचवेळी उठाव करावा, इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी, युरोपिय लोकांची संपत्ती लुटावी, इथून पुढे युरोपिय लोकांना कोणताही महसूल द्यायचा नाही.. अशा प्रकारे आदेशाविरोधात जाऊन जी गावे महसूल देतील त्यांचा नाश केला जाईल. सर्व हिंदू आणि मुसलमानांचे प्रमुख या जाहीरनाम्याच्या आशयाशी सुसंगत वागणार नाहीत त्यांना भयानक दुष्परिणाम भोगावे लागतील. युरोपिय लोकांच्या राजवटीचा विनाशकाळ आला आहे. त्यांचे निर्मुलन करायचे आहे आणि एक नवीन न्याय राजवट स्थापित करायची आहे... 

या जाहिरनाम्यामुळे जगावर राज्य करायला निघालेली राणी विक्टोरियाची कंपनी सरकार हदरली. काहीही करून या उमाजी नाईकाला आवरला पाहिजे, म्हणून कंपनी सरकारने उमाजीराजेंना पकडणारास दहा हजार रूपये इनाम व चारशे बिघे जमीन बक्षीस जाहीर केले, (सन १८०० च्या काळातले दहा हजार रुपये, आणि चारशे बिघे जमीन म्हणजे जवळजवळ तीनशे एकर जमीन) या जाहिरनाम्यामुळे उमाजीराजेंची इंग्रजांवर किती प्रचंड दहशत होती, इंग्रज किती धास्तावले होते, हे आपल्याला कळून येते...


पण उभ्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्याचे प्रथम स्वप्न दाखणारा सह्याद्रीचा ढाण्या वाघ मात्र याच मातीतल्या फितुरांच्या चालीने इंग्रजांच्या कपटी जाळ्यात फसला. दिनांक १५ डिसेंबर १८३१ रोजी, उत्रौळी गावचा कुलकर्णी आणि उमाजीराजेंचे दोन साथीदार या तीन फितुरांनी ४०० बिघे जमीन आणि १० हजार रूपयांच्या इनामाकरिता उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रजांना मदत केली.


मायभूमीच्या स्वातंत्र्याचे प्रथम स्वप्न पाहणारा हा क्रांतीवीर दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी मोठ्या स्वाभिमानाने या देशासाठी फासावर चढला... परत कुणी इंग्रजांविरुद्ध बंड करू नये म्हणून लोकांमध्ये आपली दहशत बसण्यासाठी इंग्रजांनी फाशी दिलेले उमाजीराजेंचे प्रेत पिंपळाच्या झाडाला तसेच तीन दिवस लटकवून ठेवले होते. इंग्रजांनी उमाजीराजेंना फाशी देऊन फक्त देहाने संपवलं पण त्यांनी निर्माण केलेली बंडाची आग मात्र इंग्रज काही केल्या विझवू शकले नाहीत. पुढे जो काही इतिहास घडला तो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. 

खरंतर वरती म्हणल्याप्रमाणे इतिहासात 'जर' आणि 'तर' या गोष्टीला अजिबात स्थान नाही. पण एक कवी म्हणून मला असं म्हणू वाटतं कि 

जर फितुरीचं बीज आमच्या मातीत उगवलं नसतं

तर दिडशे वर्ष माझ्या देशाला 

इंग्रजांच्या गुलामीत खितपत पडावं लागलं नसतं.!


आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची सनावळी खालीलप्रमाणे

१७९१ ते १८०२-०३ : जन्म ते रामोश्यांचे परांड्याकडे जाणे

१८०३ ते १८१४ : निश्चित माहिती नाही

१८१४ ते २७ ऑगस्ट १८२५ : परांड्याचा संघर्ष ते नेतृत्वाचा स्विकार 

जुलै १८२८ ते १६ डिसेंबर १८३० : इंग्रजांची नोकरी व अखेरीस नजरकैद

१६ डिसेंबर १८३० ते १५ डिसेंबर १८३१ : इंग्रजांबरोबर दुसरा संघर्ष

१५ डिसेंबर १८३१ ते ३ फेब्रुवारी १८३२ : कैद खटला आणि फाशी


या देशात ब्रिटीश सत्तेच्या विरोधात सर्वप्रथम सशस्त्र बंड करून, सलग १४ वर्ष इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र  अभिवादन.


 संकलन - पत्रकार अनिल तुपे (हिंदी मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष. श्रीगोंदा.)


Powered by Blogger.