ई-केवायसीसाठी गावपातळीवर विशेष मोहीम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ; २१ फेब्रुवारीपर्यंत मुदत
वाशिम, : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ई- केवायसी करण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत गावस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकचे सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र. पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात
पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बॅंक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी प्राधान्याने नजीकचे पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासनाकडून पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. तसेच पीएम किमान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी ६ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण व ४ हजार ५०९ स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६० हजार ८७० लाख शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून केवळ ९ हजार ३३० शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) मार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत १० दिवसांची ही संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे.