वडाळी येथील शेतकर्यांची रब्बी पिके वाचविण्या -साठी धडपड.
लोकप्रतिनिधी,तहसीलदार यांसह विद्युत अभियंत्याला निवेदने
नांदुरा प्रतिनिधी प्रशांत पाटील
नांदुरा तालुक्यातील ग्राम वडाळी येथील शेतकरी बांधव अनियमित व खंडित वीज पुरवठयाने खूपच हवालदिल झाला आहे.रब्बी पिकांना नियमित व अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी वडाळी येथील शेतकऱ्यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी खा.रक्षा खडसे,आ. राजेश एकडे,पोलीस स्टेशन नांदुरा,तहसीलदार नांदुरा यांचेसह उप कार्यकारी अभियंता महावीतरण नांदुरा यांना निवेदनाद्वारे साद घातली आहे .यावर्षी पिकांना मिळालेला कवडीमोल भाव,कमी व अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतांना सध्या रब्बी पिकांवर आस लावून नांदुरा तालुक्यातील वडाळी येथील शेतकरी गहू,ज्वारी,हरभरा,कांदा यांची लागवड करून बसला आहे.तूर,सोयाबीन हातचे गेले आहे.विज पुरवठा जर नियमित व अखंडित राहिला तर रब्बी पिकांना पाणी मिळून किमान रब्बी पीक तरी हातात येईल या आशेवर शेतकरी बांधव आहेत.परंतु काही दिवसांपासून अनियमित व बेभरवशाच्या वीज पुरवठ्याने पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने रब्बी पिकसुद्धा हातचे जाते की काय अशी शेतकरी वर्ग भीती बाळगून आहेत.पाण्याअभावी पिके वाळत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
वडाळी शिवारातील वीज पुरवठा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नेहमी नेहमी खंडित होऊन नांदुरा महावितरणच्या असमर्थतेच्या कार्यामुळे वडाळी येथील शेतकरी बांधव खूप त्रस्त झाले आहेत .सदर बाब शेतकऱ्यांच्या जीवितासी संबंधित असल्यामुळे अशा त्रासामुळे एखाद्या शेतकऱ्याने जर टोकाचे पाऊल उचलले तर याला पूर्णपणे महावितरण कार्यालय नांदुरा यांचे अधिकारी जबाबदार राहतील तसेच सदर समस्येवर उपाय न झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आमची मुले बाळ उपाशी राहतील याला सुद्धा पूर्णपणे महावितरण व प्रशासन जबाबदार असेल .म्हणून आमच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून सकारात्मक उपायोजना करावी असे निवेदनात म्हटले आहे.रब्बी पिके वाचावी म्हणून वडाळी येथील शेतकऱ्यानी दिलेल्या निवेदनावर प्रशासन आणि महावितरण काय पावले उचलते याकडे समस्त वडाळी गावकर्यांचे लक्ष लागून आहे.