जय बाबाजींच्या जयघोषाने दुमदुमले श्रीक्षेत्र वाई गौळ
*५८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम):-
तालुक्यातील तीर्थक्षेत्र अमरगड,वाई गौळ चे महान तपस्वी संत श्री काशिनाथ महाराज उर्फ बाबाजी यांच्या ५८ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भागवत कथा सप्ताहाच्या समारोपप्रसंगी भव्य महाप्रसादाचे आयोजन श्रद्धाळूंसाठी आयोजन आज चैतन्यमय वातावरणात संपन्न झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संत श्री बाबाजींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य महाप्रसादाचा ५०,००० पेक्षा अधिक भाविक भक्तांनी लाभ घेतला. वाशिम जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यातील हजारो श्रद्धांळूंनी या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
वाशिम जिल्ह्याच्या टोकाला व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर लागून असलेल्या अमरगड, वाई गौळ हे स्थान संत श्री काशिनाथ महाराज यांच्या तपोभूमीमुळे दोन्ही जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तपस्वी संत श्री काशिनाथ महाराज यांनी अमरगड, वाई गौळ येथे संजीवन समाधी घेतलेली आहे. तपस्वी संत श्री काशिनाथ बाबांच्या समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी वाई गौळ येथे मोठ्या भक्ती भावाने मंगलमय धार्मिक वातावरणात हजारो भाविक भक्तांच्या साक्षीत सप्ताह भर श्रीमद् भागवत कथेसह विविध धार्मिक कार्यक्रम स्थानिक ग्रामस्थ व संजीवन समाधी सोहळा उत्सव समितीद्वारे धुमधडाक्यात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो.
७ तारखेला जय बाबाजींच्या जयघोषात हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. काशिनाथ बाबांच्या दरबारी येणारा कुठलाही भक्त तृप्त होऊन जावा याकडे उत्सव समिती सदस्य आणि स्थानिक सेवाधारी नागरिकांकडून विशेष काळजी घेतल्या जाते. काशिनाथ बाबा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त वाई गौळ येथील स्थानिक नागरिक सप्ताहाभर आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले घर आणि आजूबाजूच्या परिसराला रांगोळीने सजवून ठेवण्याचे निदर्शनास आले. अमरगड, वाई गौळ येथील सवासनी मुली दसरा दिवाळीला माहेरी न येता ब्रह्मचारी तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा यांच्या संजीवन समाधी सोहळा निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमाला आवर्जून माहेरी येतात. ह.भ.प. दीपक महाराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून श्रीराम महाराज चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात श्रीमद् भागवत सप्ताह अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा आणि यात्रेचा लाभ संत श्री बाबाजींना मानणाऱ्या स्थानिक व परगावाच्या नागरिकांनी शिस्तीत घेतला.