सामाजिक न्याय भवन येथे लक्षवेधी लाक्षणिक उपोषण
वाईगौळ आश्रमशाळेला अभय देणाऱ्या बहुजन कल्याण विभागाचे निषेध नोंदविण्यासाठी उपोषण
मानोरा.ता.प्र / बाबुसिंग राठोड :- (वाशिम) :-
मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथील आश्रमशाळा ही अत्यंत मनमानी पद्धतीने चालविण्यात येत असल्याच्या तक्रारी असूनही जिल्हा कार्यालय मात्र कारणे दाखवा नोटिसा देण्यापलीकडे कुठलीही कार्यवाही करत नाही. उलट संस्थेला संरक्षण देत संस्थाचालकासोबत आपले हितसंबंध जोपासत गोपनीयरित्या बेकायदेशीर कामाचा धडाका लावलेला असल्याने उपोषणकर्ते ॲड. श्रीकृष्ण राठोड आणि इंद्रजीत राठोड यांनी याकडे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उद्या (दि.२०) सामाजिक न्याय भवन, वाशिम परिसरात तूर्तास एक दिवसीय लक्षवेधी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
सहाय्यक संचालक, कार्यालयाने उपोषणकर्त्यांच्या रास्त आणि कायदेशीर मागण्या मान्य न केल्याने व केवळ कार्यवाही चालू असल्याने उपोषण मागे घेण्यात यावे असे पत्र दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी त्यांच्या आदेशाचे सविनय पालन करनार नसल्याचे उलटटपाली कळविले आहे.
*मागण्या*
अ. मा. संचालक, इमाव बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांच्या आदेशाचे अनुपालन तात्काळ करावे.
आ. यापूर्वी प्रस्तुत आश्रमशाळेतील पदभरती रद्द ठरविल्याने अवैध जाहिरात काढणाऱ्या संस्था पदाधिकाऱ्यावर आश्रमशाळा संहितेमधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हे नोंदविने.
इ. उक्त रद्द पदभरतीमधील कर्मचाऱ्यांची नावे तात्काळ आश्रमशाळेच्या कर्मचारी नोंदवहीमधून कमी करण्यात यावे.
ई. वसतिगृहात अनिवासी विद्यार्थ्यांनाच निवासी दाखवून परिपोषण अनुदान लाटत असल्याने त्याबाबत तात्काळ चौकशी व कारवाई होण्याबाबत.
उ. दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता शाळा प्रमुखास, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याकरीता बंधनकारक करावे व कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करावी.
ऊ. प्रस्तुत आश्रमशाळेत तात्काळ आश्रमशाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यापरिषद स्थापन करावी.
ऋ. निवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता आदर्श दिनचर्येचे पालन करण्याबाबत वसतिगृह अधीक्षक यांना निर्देश द्यावेत.
ल. निवासी विद्यार्थ्यांना नियमानुसार संतुलित आहार देण्याची व्यवस्था करावी.