Breaking News
recent

आ. संजय कुटे पाचव्यांदा जिंकणार की विरोधक भाजपचा गड भेदणार?

 

काँग्रेसच्या सलग चार टर्म पराभवानंतर जळगांव जामोद मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा!


भगवंता चोरे जिल्हा प्रतिनिधी 

बुलढाणा : येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉ. संजय कुटे यांचा विरोधक पराभव करणार की आमदार कुटे एकर्तफी निवडणूक जिंकून पुन्हा पाचव्यांदा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्याचा काही भागाचा समावेश असलेल्या जळगाव जामोद मतदार संघात भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांचे प्राबल्य आहे. या मतदार संघात त्यांनी विजयाची चौकार पूर्ण केली असून यंदाच्या निवडणूकीत भाजपकडून ते पाचव्यांदा मैदान उतरणार आहेत. डॉ. संजय कुटे यांनी तीन टर्म आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांचा पराभव करत बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या वीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात घेतला आहे. १९८९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवलेले कृष्णराव इंगळे पहिल्यांदा या मतदारसंघांमधून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत १९९४ व १९९९ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते विजयी झाले. २००४ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे युवा उमेदवार डॉ. संजय कुटे यांनी काँग्रेसचे कृष्णराव इंगळे यांचा ६ हजार ८०१ मतांनी पराभव केला. त्या निवडणूकीमध्ये भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार मजीद हैदर यांनी तब्बल २१ हजार ५५७ मतं घेतल्याने कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला होता, असं आजही बोलले जात आहे. २००९ च्या निवडणूकीत काँग्रेसने माजी आ. कृष्णराव इंगळे यांचा तिकीट कापत नवीन चेहरा म्हणून धनगर समाजाचे रामविजय बुरुंगले यांना उमेदवारी दिल्याने ते थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर काँग्रेसमधून भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश केलेले प्रसेनजित पाटील यांनी भारिपकडून निवडणूक लढवली. यात पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहत त्यांचा अत्यल्प म्हणजे ४ हजार ४७ मतांनी पराभव झाला. नंतर २०१४ च्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेसने पुन्हा रामविजय बुरुंगले यांना तिकीट देत विश्वास दाखवलं परंतू पुन्हा ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रसेनजित पाटील यांनी भारीपवर दुसऱ्यांदा उभे राहत भाजपचे उमेदवार डॉ. कुटे यांना कडी झुंज दिली परंतू पाटील यांचा पुन्हा अत्यल्प म्हणजे ४ हजार ६९५ मतांनी पराभव झाला. २००९ आणि २०१४ च्या निवडणूकीत भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार असलेले आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले प्रसेनजित पाटील यांनी २०१९ च्या निवडणूकीत तिकीट मिळेल या आशेने काँग्रेसमध्ये घरवापसी केली परंतू काँग्रेस प्रवेश हे त्यांचेसाठी दुर्दैवच म्हणावे लागेल कारण काँग्रेसने माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या कन्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांना उमेदवारी दिली. परंतू काँग्रेसच्या उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर यांचा तब्बल ३५ हजार २४१ मतांनी पराभव करून डॉ. संजय कुटे चौथ्यांदा निवडून आले.

या मतदारसंघामध्ये भाजपचे विरोधक पक्षात अंतर्गत असलेली गटबाजी आणि मतदार संघात भाजपचे विरोधात कुणाही एकाला तिकीट मिळालं की अन्य सर्व इच्छुक विरोधात जातात हे आतापर्यंतचं चित्र आहे. याचा फायदा हा भाजप उमेदवाराला होत असल्याचा इतिहास या मतदारसंघाचा राहिला आहे. पहिले कृष्णराव इंगळे त्यानंतर दोन पंचवार्षिकला रामविजय बुरुंगले आणि चौथ्या टर्ममध्ये डॉ. स्वातीताई वाकेकर, असं तब्बल वीस वर्षापासून काँग्रेसचा सातत्याने पराभव होत असल्याने यंदा हा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. दोन निवडणूकीत अत्यंत कमी मताने पराभूत झालेले प्रसेनजित पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार आहे. महाविकास आघाडीमध्ये मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास डॉ. संजय कुटे यांच्यासमोर प्रसेनजित पाटील यांचे आवाहन राहणार आहेत. राष्ट्रवादीकडून प्रसेनजित पाटील, संगीतराव भोंगळ यांच्यासह बऱ्याच इच्छुकांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघामध्ये राजकीय समीकरणापेक्षा सामाजिक समीकरणावर निवडणूक लढवली जात असल्याचा इतिहास आहे. माळी, मराठा आणि कुणबी समाजाची मते अधिक आणि मुस्लिम, बौद्ध, बारी, धनगर समाजाची मते लक्षणीय आहेत. महाविकास आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास स्वातीताई वाकेकर या बंडखोरी करत वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा देखील मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे सामाजिक समीकरण जुळवत वंचितकडून माळी समाजाला उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडीकडून मराठा समाजाला उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. असे समीकरण या मतदारसंघात असल्यास या ठिकाणी भाजपा, महाविकासआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी टक्कर पाहायला मिळू शकते.



Powered by Blogger.