एससी , एसटी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज पासून नांदेड. मध्ये आमरण उपोषण .....
हदगाव प्रतिनिधी पंडित नरवाडे.
नांदेड : एससी, एसटी प्रवर्गातील वर्गवारी करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आज दिनांक 18 सप्टेंबर पासून नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असून सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय तात्काळ रद्द करावा या व अन्य मागण्यांसाठी ओबीसीचे नेते दत्तात्रय अनंतवार आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल पाईकराव हे अमरण उपोषण करणार आहेत.
देशातील कायदा व सुव्यवस्था प्रचंड बिघडत चालली असतानाच माननीय सुप्रीम कोर्टाने एससी , एसटी प्रवर्गामध्ये वर्गवारी करण्याचा नुकताच निर्णय दिला आहे . हा निर्णय संविधानाची पायमल्ली करणारा असून सर्वोच्च न्यायालयाला असे निर्णय देण्याचा कुठलाही अधिकार नाही. तरीही केवळ आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली ही भूमिका संविधानाच्या विरोधात आणि संविधानाला मारक आहे . त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी घेऊन दिनांक 18 सप्टेंबर पासून नांदेडमध्ये आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याशिवाय मुस्लिम समाजाला न्यायमूर्ती आर.एन. बापट यांनी 52 मुस्लिम कम्युनिटीच्या अनुषंगाने दिलेल्या शिफारशी लागू करून एस सी बी सी मधून त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे. ओबीसी मधून देण्यात आलेले कुणबी मराठा प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावेत. ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करावे . ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. आदी मागण्यांसाठी ओबीसी नेते दत्तात्रय अनंतवार आणि सामाजिक कार्यकर्ते अतुल पाईकराव हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाला एस सी , एस टी, मुस्लिम आणि ओ बी सी समाज घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून शासनाने आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ या संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन राज्य स्वरूपी आणि राष्ट्रीय स्तरावरील होईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.