राहेरी बुद्रुक येथिल कमकुवत असलेल्या पुलावरुन जड वाहतुक सुरु एस.टी. बसेस मात्र बंद
प्रतिनिधि:-अनिल दराडे
सिंदखेडराजा:- जालना मेहकर महामार्गावर खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पुल हा कमकुवत झाल्यामुळे त्यावरील जड वाहतूक प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आली आहे. परंतु सदरील बंद करण्यात आलेली जड वाहतूक फक्त नावालाच दिसते आहे या पुलावरुन मल्टीअॅक्सल ट्रक सर्रासपणे चालु आहेत मात्र एस.टी.महामंडळाच्या बसेस बंद आहेत त्यामुळे एस.टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
सदरील पुल कमकुवत झाल्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली असुन प्रशासनाच्या वतीने सिंदखेडराजा येथुन देऊळगावराजा मार्गे व मेहकर येथुन चिखली मार्गे सदरील वाहतूक वळविण्यात आली आहे या दोन्ही ठीकाणी पोलिस बंदोबस्त असतांना मल्टीअॅक्सल ट्रक व इतर वाहने येतातच कशी? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
जर या पुलावरुन मल्टीअॅक्सल ट्रक येऊ शकतात तर मग बस का नाही असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.
त्याचबरोबर सदरील पुलाच्या कामासाठी तढेगाव फाटा ते राहेरी बुद्रुक बायपासचे काम सुरु आहे ते सुद्धा संथ गतीने चालु आहे राजकीय हस्तक्षेप व प्रशासनाकडुन कामामध्ये होत असलेली दिरंगाई यामुळे यामध्ये सर्वसामान्य प्रवाशी मात्र भरडल्या जात आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील प्रकरणावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना करुन बायपास सुरु करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होते आहे.
सदरील पुलावरुन सर्रास जड वाहतूक सुरु आहे परंतु बसेस मात्र बंद आहेत जर सदरील पुलावरुन मल्टीअॅक्सल ट्रक येऊ शकतात तर मग एस.टी.बस का येऊ शकत नाही. सदरील पुलावरुन बंद असलेल्या एस.टी.बस.सेवा बंद असल्या कारणामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
:- आनंद देशमुख (भाजपा सरचिटणीस सिंदखेडराजा)
-------------------------------------------
राहेरी बुद्रुक येथिल खडकपूर्णा नदीवरील पुल कमकुवत झाल्यामुळे त्यावरील जड वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे परंतु ती फक्त नावालाच दिसते आहे या पुलावरुन जड वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असलेली पहावयास मिळत आहे त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
:- अभिजीत देशमुख (मनविसे तालुकाउपाध्यक्ष)